उमरखेड (नांदेड)- परिवारासह सहस्त्रकुंड धबधबा पहाण्यासाठी आलेली महिला 2 मुलींसह धबधब्यात वाहून गेल्याची घटना घडलीये. यामध्ये दोन मुलींना वाचवण्यात यश आलं आहे. पैनगंगा नदीवर असलेल्या मुरली गावच्या बंधाऱ्याचं पाणी अचानक सोडण्यात आल्यानं ही दुर्देवी घटना घडली. ममता संतोष कुमार असं या महिलेचं नाव आहे.
यवतमाळ येथील पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक संतोष कुमार हे शनिवारी बँकेला सुटी असल्यानं, उमरखेड तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड धबधबा पहाण्यासाठी आपल्या परिवारासोबत आले होते. धबधबा पहात असतांना अचानक पैनगंगा नदीवर असलेल्या बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आल्यानं, ममता संतोष कुमार या आपल्या 2 मुलींसह वाहून गेल्या. ही घटना लक्षात येताच संदीप राठोड या तरुणाने पाण्यात उडी घेतली त्याला 2 मुलींना वाचवण्यात यश आलं आहे. शोधमोहिम सुरू असून, अद्यापपर्यंत मुलीच्या आईचा शोध लागू शकलेला नाही. अशी माहिती सहस्त्रकुंड ट्रस्टचे सचिव सतिश वाळकीकर यांनी दिली.