नांदेड - कोरोना रुग्णांना दिलं जाणारं भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप आमदार बालाजी कल्याणकर यांनी केला आहे. नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. ते सध्या गुरुगोविंद सिंगजी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. यावेळी रुग्णांना दिलं जाणारं भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत, आ. कल्याणकर यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.
दरम्यान प्रशासनाच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळचं जेवण रुग्णालय प्रशासनाकडून दिलं जातं. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून खासगी व्यक्तीला भोजन बनवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.
आमदार कल्याणकरांची जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार
दरम्यान या प्रकरणी बालाची कल्याणकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर आणि डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे संबंधित कंत्राटदाराची तक्रार केली आहे. सकाळी ७ वाजता रुग्णांना देण्यात येणारा नाष्टा 9 वाजल्यानंतर रुग्णांना देण्यात आला. हा नाष्टा पॅकबंद डब्यात देण्याऐवजी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये देण्यात येत असल्याचेही कल्याणकर यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी रुग्णालयात जेवण आणि नाष्टा पुरविणाऱ्या कंत्राटदारास बोलावले असता, आमदार कल्याणकर यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले.
रेमडेसिवीरची जादा दराने विक्री होत असल्याची तक्रार
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा देखील अधिक आहे. रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर या इजेक्शनाची अधिक दराने विक्री होत असल्याची तक्रार देखील यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी कल्याणकर यांच्याकडे केली आहे.
लोकप्रतिनिधींना अशी वागणूक तर सर्वसामान्यांचं काय?
शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आमदार बालाजी कल्याणकर यांना रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार पाहायला मिळाला. कोरोना रुग्ण बारा करण्यासठी औषधांसोबत चांगला आहार देखील महत्त्वाचा आहे. या रुग्णालयात ग्रामीण भागातून आलेले रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होतात. त्यांच्या जेवनाचे हाल होऊ नये, त्यांना वेळत जेवन मिळावे यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र जर आमदारालाच चांगल्या सुविधा मिळत नसतील तर सर्वसामान्या लोकांचे काय असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा - सकारात्मक..! शिवडीच्या 'या' प्रभागात नागरिकांनी मिळवला कोरोनावर विजय