नांदेड - प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. विभागात सुरू झालेल्या २५ पैकी १५ साखर कारखाने बंद झाले आहेत. या कारखान्यांनी मार्च अखेर ९२ लाख टन उसाचे गाळप झाले तर ९२ लाख २८ हजार क्विंटल साखरचे उत्पादन झाल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सुत्रांनी दिली.
विभागाचा सरासरी साखर उतारा ९.९७ टक्के -
प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२०-२१साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १७ खासगी तर नऊ सहकारी साखर करण्यांचा समावेश होता. आजपर्यंत २५ कारखान्यांनीच गाळप सुरू केले आहे. यात १० सहकारी तर १५ खासगी कारखान्याचा समावेश होता. या २५ कारखान्यांनी मार्च अखेर ९२ लाख ५६ हजार ६८४ टन उसाचे गाळप केले आहे. ९ २ लाख २८ हजार ६८५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.९७ असल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सुत्रांने दिली.
25 पैकी 15 कारखान्याचा गाळप हंगाम संपला -
दरम्यान सध्या हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. विभागातील २५ पैकी १५ कारखान्यांचा पट्टा पडला असून गाळप हंगाम संपला आहे. ऊस संपत आल्यामुळे इतर १० कारखानेही लवकरच बंद होतील अशी शक्यता आहे.
गाळप आणि उताऱ्यात बळीराजा अव्वल -
नांदेड विभागात सर्वाधिक गाळप व साखर उताऱ्यात परभणी जिल्ह्यातील बळीराजा साखर कारखाना कानडखेड ( ता . पूर्णा ) हा खासगी कारखाना अव्वल ठरला आहे. या कारखान्याने मार्च अखेर सहा लाख ४५ हजार ३४५ टन उसाचे गाळप करत सात लाख ३० हजार आठशे क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या कारखान्याचा साखर उतारा ११.३२ टक्के आला आहे. हा उतारा विभागात सर्वाधीक आहे.
नांदेड विभागातील एकूण कारखाने गाळप (मे. टनमध्ये) -
नांदेड (सहा)-१९,१४,४६४
लातूर (आठ)-३०,८९,६७८
परभणी (सहा)-२७,५२,२७७
हिंगोली (पाच)- १५,००,२६४
एकूण २५ कारखाने-९२५६६८४