नांदेड - दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तसेच तिकीट धारक प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत विनातिकीट प्रवास करणाऱ्या १२८५ प्रवाशांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून ६ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. १० ते १५ जुलै दरम्यान ही तपासणी मोहीम राबवण्यात आली होती.
प्रवाशांकडून ६ लाख १० हजार रुपये दंड वसूल -
या तिकीट तपासणी मोहिमेत नांदेड ते मुदखेड, नांदेड ते आदिलाबाद, नांदेड ते मनमाड, नांदेड ते अकोला अश्या विविध भागात धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये अचानक धाडी टाकण्यात आल्या. यात तब्बल १२८५ विनातिकीट प्रवाशी सापडले. तसेच अनियमित प्रवास करणे आणि परवानगी शिवाय जास्त सामान घेऊन जाण्यामुळे काही प्रवाश्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच या विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ६ लाख १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, नागरिकांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा, त्याच बरोबर रेल्वे प्रवासात कोविड-१९ च्या राज्य शासन आणि केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांचे पूर्ण पालन करावे, असे आवाहन नांदेडचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक जय पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा - राज ठाकरे आश्वासक चेहरा, पण परप्रांतीयविरोधी भूमिका बदलावी- चंद्रकांत पाटील