नांदेड- हदगाव शहरातील राठी चौकात राहणाऱ्या एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या घरावर शुक्रवारी पहाटे पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकून ११ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. रोख रक्कम व ३० तोळे सोन्याचे दागिणे असा ११ लाख रुपयांचा ऐवज घेत दरोडेखोर प्रसार झाले.
हदगाव येथील व्यापारी हरिप्रसाद नंदलाल सारडा (वय ७७) रा. राठी चौक,हदगाव हे गुरुवारी रात्री जेवण करुन कुटुंबियांसमवेत झोपले होते. दरवाजा वाजल्याचा आवाज आला. त्यामुळे हरिप्रसाद सारडा यांनी उठून घराचा दरवाजा उघडला. सारडा यांना बाहेर पाच अनोळखी व्यक्ती दिसल्या. त्यापैकी एकाने सारडा यांना धक्का देवून बाजुला केले. त्यानंतर दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश केला. हरिप्रसाद सारडा यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत कपाटाची चावी मागितली. त्यामुळे सारडा यांनी भयभीत होऊन चावी दिली. सारडा व घरातील मोलकरीन यांचे हात-पाय दरोडेखोरांनी बांधून टाकले. कपाटातील रोख रक्कम व ३० तोळे सोन्याचे दागिणे असा ११ लाख रुपयांचा ऐवज घेवून दरोडेखोर प्रसार झाले.
हरिप्रसाद सारडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हदगाव पोलीस ठाण्यात दरोडेखोराविरुद्ध कलम ३९५, ४५२, ५०६ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पांढरे हे करत आहेत. संचारबंदी काळातही हदगाव शहरात दरोडो पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.