नांदेड - ग्रामीण भागात देखील सुप्त गुण असलेलं अनेक संशोधक असतात. स्वतःच्या कल्पकतेने ते समाजपयोगी वस्तू, सेवा, यंत्राचा अविष्कार साकारत असतात. त्याचप्रमाणे अर्धापूर शहरातील पानटपरी चालविणाऱ्या सुशिक्षित तरुणानेही वाढते इंधन दर लक्षात घेता चार्जिंगवर चालविणारी सायकल तयार केली आहे. विशेष म्हणजे त्याने बनविलेले ही सायकल एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल चार तास टिकते आणि जवळपास पस्तीस किलोमीटरचा प्रवास सहज करता येऊ शकतो, असा दावा या ग्रामीण संशोधकाने केला आहे. शिवहार घोडेकर असे त्या संशोधकाचे नाव आहे.
शेताकडे जाण्यायेण्यासाठी केला ई-सायकलचा जुगाड-
गेल्या दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे बेरोजगार असलेल्या शिवहारने शेताकडे ये-जा करण्यासाठी दुचाकी परवडत नसल्याने सायकलचा पर्याय स्वीकारला. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे त्याने या सायकलाच ईलेक्ट्रीक सायकल बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी त्याने घरीच असलेल्या जुन्या सायकलला बॅटरी, एक्सलेटर, मोटार बसवून पायंडल न मारता ही सायकल चालावी यासाठी जुगाड केला. या प्रयोगात तो यशस्वीही झाला. बॅटरीवर चालणाऱ्या या सायकलमुळे शिवहारला कमी वेळेत शेताकडे जाता येणे शक्य झाले. तसेच दुचाकीच्या तुलनेत इंधनाचाही खर्च कमी झाला.
पर्यावरण पूरक आणि कमी खर्च...!
शिवहारने बनवलेली ही सायकल पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे त्याच्या या प्रदूषणमुक्त सायकलची सर्वत्र प्रशंसा होत आहे. दिवसेंदिवस होत असलेले प्रदूषण व वाढत्या पेट्रोलच्या किंमतीवर पर्याय काढत अर्धापूर शहरात पानटपरी चालवणाऱ्या शिवहार या तरुणाने बनवलेली ईसायकल चर्चेचा विषय झाली आहे. ही सायकल बनविण्यासाठी शिवहारला दहा ते बारा हजार रुपये खर्च आला आहे. त्यामध्ये २४ होल्ट ३५० वॅट वर चालणारी एक मोटार बसविण्यात आली आहे. तर २४ होल्ट -३५० वॅटची बॅटरी बसवण्यात आली आहे. तसेच चार्जिंग किट, लाईट, गिअर एक्सलेटर, इलेक्ट्रिक ब्रेक आदींसह वेल्डींगचा वापर करत अतंत्य कमी खर्चात त्याने ही सायकल बनवली आहे.
पाच रुपयात 35 किलोमीटर प्रवास...!
शिवहारने बनवलेल्या या सायकलाचा प्रवास अगदी कमी खर्चात करता येतो. कारण ही सायकल एकदा चार्ज केल्यास जवपळपास ३५ ते ४० किमी अतंर धावते. बॅटरी चार्ज करण्यासाठी चार तास लागतात. यासाठी केवळ पाच रुपये खर्च होत असल्याचेही शिवहारने ईटीव्ही भारतला सांगितले.
चार्जिंग फ्री मध्ये होण्यासाठी प्रयत्नशील...!
लॉकडाऊनमुळे सर्व अस्थापना बंद असल्याने त्यांनी चार्जिंगवरील सायकल बनवण्याचा प्रयोग करण्याचा संकल्प केला. त्याने त्याचे ईलेक्ट्रीक सायकल तयार करण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. त्यांच्या या वैज्ञानिक कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता येणाऱ्या काळात सायकल चालवत असतानाच चार्जिंग व्हावी यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती शिवहारने ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.