नांदेड - प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागात २४ साखर कारखाने सुरु झाले आहेत. या कारखान्यांनी बुधवार अखेर ३७ लाख टन उसाचे गाळप केले, तर ३४ लाख ३२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयातून देण्यात आली.
24 कारखान्याचे गाळप सुरू -
नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२०-२०२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १७ खासगी, तर नऊ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता. आजपर्यंत २४ कारखान्यांनीच गाळप सुरु केले आहे.
विभागाचा सरासरी साखर उतारा ९.०८ -
यात आठ सहकारी, तर १६ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या २४ कारखान्यांनी बुधवार अखेर ३७ लाख ७९ हजार ४१८ टन उसाचे गाळप केले आहे. तर यापासून ३४ लाख ३२ हजार १५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.०८ असल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयातून देण्यात आली.
'हे' साखर कारखाने आहेत सुरू -
गाळप सुरु केलेल्या कारखान्यात नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण, एमव्हीके वाघलवाडा, शिवाजी शुगर बा-हाळी, हडसणी येथील सुभाष शुगर लिमिटेड, कुंटूरकर शुगर्स लिमिटेड, कुंटूर व व्यंकटेश्वरा शुगर, शिवणी या कारखान्यांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यामधील भाऊराव चव्हाण, डोंगरकडा, पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत, कपिश्वर शुगर बाराशिव, टोकाइ कारखाना कुरुंदा, शिऊर साखर कारखाना वाकोडी तसेच परभणी जिल्ह्यातील बळीराजा साखर कारखाना कानखेड, गंगाखेड शुगर, ट्वेटीवन शुगर सायखेडा, योगेश्वरी शुगर लिंबा, रेणुका शुगर पाथरी, त्रिधारा शुगर अमडापूर हे कारखाने सुरु झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील विकास सहकारी कारखाना लातूर, मांजरा सहकारी कारखाना विलासनगर, विलास सहकारी तोंडार, रेणा, जागृती, साईबाबा, ट्विटीवन हे कारखाने सुरु झाले आहेत.
हेही वाचा - भंडारा दुर्घटनेची बाल हक्क संरक्षण आयोगाकडून दखल, 48 तासांत मागितला अहवाल