नांदेड Pigs Attacked On Patient : तुकारामला क्षयरोग झाला होता. म्हणून तो नांदेडच्या शासकीय महाविद्यालयात दाखल होता, असं वैद्यकीय प्रभारी अधीक्षक डॉ. अनिरुद्ध देवराये यांनी सांगितलं. 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू हा प्रकार काही दिवसांपूर्वीच डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात घडला होता. या परिसरात जेवण करून झाडाखाली विश्रांती घेत असलेल्या एका रुग्णाचे डुकरांच्या कळपाने अक्षरश: लचके तोडले, असा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे. त्यात या रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे तपासणीनंतरच स्पष्ट होईल असं डॉक्टरांनी सांगितलं. ही घटना उघडकीस येताच आसपासच्या परिसरात चांगलीच खळबळ उडाली.
जिवंत रुग्णाच्या शरीराचा पाडला फडशा : रुग्ण तुकाराम कसबेला उपचारासाठी 30 ऑक्टोबरला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या ठिकाणी उपचार घेऊन तो बरासुद्धा झाला होता. त्यानंतर 9 नोव्हेंबरला त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. 10 नोव्हेंबरला तो परत विष्णुपुरी येथील रुग्णालयात गेला. त्या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असलेलं जेवणही त्यानं केलं आणि तो एका झाडाखाली रात्री झोपी गेला. त्यातच रात्रीच्यावेळी डुकरांच्या कळपानं त्याच्यावर हल्ला करत शरीराचे लचके तोडले, असा दावा करण्यात येत आहे. कमरेच्या खालचा भाग, गाल आणि नाकाचा भाग डुकरांनी फस्त केला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही गंभीर बाब उघडकीस आली. त्यानंतर नागोराव कसबे यांनी रुग्णालयात धाव घेतली. नांदेड पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणात पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली गेली.
जैविक कचरा खाल्ल्याने डुकरे चवताळली : डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात डुकरांनी हौदोस मांडला आहे. या परिसरात अनेक वर्षांपासून डुकरांचा कळप सक्रिय असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णालय परिसरात प्रचंड अशी दुर्गंधी पसरली असून रुग्णांचं व रुग्णांच्या नातेवाईकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. रुग्णालय परिसरात जैविक कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने तो खाऊन परिसरातील डुकरं अत्यंत क्रूर झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यापूर्वीही रस्त्याच्या कडेला दारू पिऊन पडलेल्या एका व्यक्तीला डुकरांनी अर्धवट खाल्ल्याची घटना याच रुग्णालय परिसरात घडली होती.
हेही वाचा: