नांदेड - लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी भोकर येथील एसबीआय बँकेतील सुरक्षा रक्षकावर नायगाव पोलीस ठाण्यात बलात्कार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोपटराव रामराव गायकवाड, (रा. जाधववाडी औरंगाबाद) असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बिलोली येथे कार्यरत असताना आरोपीने पीडित महिलेच्या नवऱ्याशी ओळख वाढवून घरी येणे-जाणे सुरु केले. त्यावेळी महिलेच्या पतीने संशय व्यक्त केल्याने पती-पत्नीत वाद होवू लागले. त्यामुळे विवाहिता 3 मुलांसह माहेरी नांदेड येथे राहू लागली. दरम्यान, आरोपीने या महिलेशी फोनवर संपर्क साधून तू नायगाव येथे घर कर, तुझा सर्व खर्च करतो. तुझ्यासोबत लग्न करतो म्हणून सांगितले. त्यानंतर महिला नायगावात राहू लागली. त्यावेळी लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने महिलेशी वेळोवेळी शारीरिक सबंध प्रस्थापित केले. मात्र, लग्न करण्यास टाळाटाळ केली.
त्यावेळी भोकर येथे कर्तव्यावर असताना त्याला बोलण्यासाठी महिला गेली असता, दोघांत वाद झाला. त्यावेळी आरोपी पोपटराव गायकवाड याने मारहाण केली. मारहाणीचा गुन्हाही भोकर पोलिसांत नोंद झाला होता. या घटनेनंतर काही दिवसांनी आरोपी पुन्हा नायगावात महिलेच्या घरी आला त्यावेळी त्याने महिलेवर अत्याचार केला. तसेच पोलिसांत तक्रार केली, तर तिन्ही लेकरांसह जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलने पोलिसांत तक्रार दिली.