नांदेड- पुणे-मुंबईवरून आलेल्या ३ हजार ५०० प्रवाशांना विलगीकरणासाठी हातावर स्टँम्पिंग करण्यात आली असून, त्याना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. अशा व्यक्ती बाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने आरोग्य विभागाकडून तयार केलेल्या विलगीकरण वॉर्डमध्ये सक्तीने ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
सोमवार (दि.२३) सकाळी ५ वाजेपासून ३१ मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात येत असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व आस्थापना पूर्णपणे बंद राहतील. काल कोरोनाविषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेची बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर सूचना दिल्या. बैठकीत सोमवारपासून जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई राहील असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
त्याचबरोबर, एमआयडीसी भागातील खाद्यतेल व शहरातील भाजीपाला व जीवनावश्यक बाबी वगळता इतर सर्व दुकाने व अस्थापना बंद राहतील. हॉटेल व खानावळ बंद राहील, मात्र योग्य ती खबरदारी घेऊन नागरिकांना पार्सल देण्याची मुभा असेल. जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) बंद राहतील. मात्र, कुणा व्यक्तीस सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे आजार असल्यास त्याची तत्काळ आरोग्य सेवा वॉर्डामध्ये तपासणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
आरोग्य विभागाने आवश्यक असलेले औषधी व साहित्य तत्काळ उपलब्ध करून दरपत्रके मागवून घ्यावीत. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी तलाठी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ते यांच्यामार्फत मुंबई-पुण्यावरून आलेल्या व्यक्तींची चौकशी व्हावी. यामध्ये तलाठी, ग्रामसेवक यांनी विलगीकरण केलेल्यांची तपासणी करावी. गर्दी वाढत असल्यास मार्चपर्यंत एपीएमसी व इतर बँका बंद करण्यात याव्यात, अशा सूचना इटनकर यांनी दिल्या.