नांदेड - कोरोनामुक्त नांदेड शहरात बुधवारी पहिल्यांदाच एक ६४ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. या रुग्णावर उपचार सुरू असून तो राहात असलेल्या पीर बुऱ्हाननगरच्या जवळचा ५ किमी परिसर पूर्णत:सील करण्यात आला आहे.
जिल्ह्यात एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर प्रशासन अधिक दक्ष झाले असून यानिमित्ताने कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. आत्तापर्यंत एकूण 754 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून 242 जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अजून 65 जण निरीक्षणाखाली असून रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये 119 जण आहेत. तर, 635 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज(गुरुवार) 51 जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण 500 जणांची तपासणी करण्यात आली असून 444 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, 50 जणांचा नमुने तपासणी अहवाल बाकी आहे. 5 नमुने नाकारण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण 78 हजार 150 प्रवासी असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.