नांदेड - मुदखेड ते परभणी दरम्यान ८१.४३ किलोमीटर दुहेरीकरणाचे कार्य पूर्णत्वास आले आहे. या भागातील परभणी- मिरखेल-लिंबगाव-मुदखेड या दरम्यान दुहेरीकरणाचे कार्य पूर्ण होऊन रेल्वे गाडी या मार्गावर या पूर्वीच धावत आहे. या भागातीलच लिंबगाव-चुडावा-पूर्णा-मिरखेल दरम्यान दुहेरीकरणाचे ३१.९३ किलोमीटर चे काम पूर्णकरण्यासाठी आणि एकेरीच्या तसेच रेल्वे पटरी आपसात जोडण्यासाठी नऊ दिवसांचा लाईन ब्लॉक हाती घेण्यात आला आहे.
हा ब्लॉक ०२ दिवस प्री-नॉनइंटरलॉक वर्किंग करता ०६ आणि ०७ फेब्रुवारीला आणि नॉनइंटरलॉक वर्किंग करता ०८ ते १४ फेब्रुवारी दरम्यान असा ०९ दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. नॉन इंटरलॉक वर्किंग नंतर चार दिवस दिनांक १५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान या ब्लॉक चा परिणाम म्हणून रेल्वे गाड्यांवर होणार आहे. या ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या रद्द, काही अंशतः रद्द, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या या काळात उशिरा धावतील. या ब्लॉक मुळे जनतेला होणाऱ्या असुविधेबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे. दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्याकरता हा लाईन ब्लॉक घेणे अनिवार्य होते, तरी जनतेने रेल्वे प्रशासनास या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिघ यांनी केले आहे.