नांदेड- व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या चौघांविरुद्ध देगलूर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. चौकशीसाठी या चौघांनाही नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईने खळबळ उडाली असून ग्रुप अॅडमीनचा ग्रुप सेटिंग बदलून इतर सदस्यांना पोस्ट टाकण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
समाजात तेढ निर्माण होईल अशी एक पोस्ट देगलूर शहरातील विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरत आहे. या पोस्टमुळे सामाजिक शांतता बाधित होवू शकते ही बाब निदर्शनास आल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे धोरण अवलंबले आहे. पोस्ट टाकणाऱ्या व त्यावर भाष्य करणाऱ्या चौघांना शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, शहरात शांतता व सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्यासाठी येथील नागरिकांनी कायम पुढाकार घेतला आहे. हीच परंपरा या पुढेही कायम राहील. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये अथवा सामाजिक शांतता धोक्यात येईल, असे वर्तन करू नये, असे आवाहन देगलूरचे नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी केले आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्याशी संपर्क साधला असता सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींवर सायबर विभागाचे बारकाईने लक्ष आहे. सामाजिक शांतता बाधित होईल, अशी पोस्ट व्हायरल केल्यास अथवा चुकीच्या अफवा पसरवल्यास सबंधितांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी या कारवाईस दुजोरा दिला आहे.
हेही वाचा- मंत्री अशोक चव्हाण यांच्या मुलीनी कुसुम महोत्सवात लावला स्टॉल