नांदेड - नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'ऑनरेक्स' या औषधांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. या साठ्याची किंमत 90 हजार रुपये आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. नशेच्या आहारी गेलेले तरुण कधी व्हाईटनर तर कधी कोरेक्स'सारख्या औषधांचा नशेसाठी वापर करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कोरेक्सवर सरकारने बंदी आणल्यानंतर व्यसनाधारी मंडळींनी 'ऑनरेक्स' हे नशा देणारे औषध वापरणे सुरू केले आहे.
ऑनरेक्स या औषधाची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शक्तीनगर ते केळीमार्केट दरम्यान एका निनावी टिनपत्र्याच्या दुकानावर छापा टाकून सुमारे ९० हजाराची औषधी जप्त केली. विशेष म्हणजे, हे औषध विकणाऱ्या दुकानदाराकडे कोणतेही लायसन्स नव्हते. तसेच ही औषधे विकली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला नव्हती. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेश्वर संगनवार हे बेकायदेशीररीत्या नशा येणाऱ्या औषधाची विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. शक्तीनगर ते केळी मार्केट रोड दरम्यान असलेल्या एका टिनशेडच्या दुकानात पोलिसांनी छापा टाकला असता, औषधाचा मोठा साठा आढळून आला. औषधी विक्री संबंधातील कागदपत्रे व परवान्याचा तपास केला असता,संगनवार यांच्याकडे कुठलेही कागदपत्र आढळून आले नाहीत. या वेळी दुकानाची झाडाझडती घेतली असता, ऑनरेक्स, रेक्सकॉफ या औषधासोबतच झोपेच्या गोळ्या व लैंगिक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या पोलिसांना आढळून आल्या. याची विचारणा केली असता, दुकानदार काहीच सांगण्यास तयार नव्हता.
या छाप्यात पोलिसांनी ऑनरेक्सच्या ७३३ बाटल्या तसेच रेक्सकॉफच्या नऊ बाटल्या अशा एकूण ७२४ बाटल्या जप्त केल्या. सर्व औषधे मिळून सुमारे ९० हजाराचा माल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या आदेशानुसार व एलसीबीचे प्रमुख द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भारती, व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. औषधांचा साठा पोलिसांनी जप्त केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाला पुढील कारवाईसाठी बोलावण्यात आले. ऑनरेक्स व रेक्सकॉफ या औषधात नशा येण्याचे असलेल्या घटकाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय त्याची विक्री करता येत नाही. असे असताना देखील संबंधित दुकानदाराने विक्री केली असली तरी, त्याचे नेहमी येणारे गिऱ्हाईक कोण आहेत, सोबतच दुकानदाराने औषधे कोणाकडून मागविली, याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुकानदार राजेश्वर संगनवार याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भरती करीत आहेत.