नांदेड- जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मका आणि ज्वारीची आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी विकास महामंडळाने जून महिन्यापासून खरेदी सुरु केली होती. या खरेदीचे प्रलंबित असलेले चुकारे देण्यात यावेत. तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात ज्वारी शिल्लक असल्याने ज्वारी खरेदी सुरु करावी, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने या मागणीचा पाठपुरावा राज्य सरकारकडे केला होता. राज्य सरकारने केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडे ज्वारी खरेदीची मागणी केली होती. केंद्राकडे सुद्धा संपर्क साधून राज्य शासनाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची विनंती पाटील यांनी केली आहे.
किनवट तालुका आदिवासी बहुल असल्याने राज्य सरकारने आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी महामंडळाकडून ज्वारी आणि मका खरेदी केली होती. त्यानुसार १८ मे ते ३० जून दरम्यान किनवट तालुक्यातील इस्लापूर आणि चिखली येथील खरेदी केंद्रावर ५००४८ क्विंटल मका आणि ११२९८ क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात आली होते.
मान्सूनच्या सुरुवातीला या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने या भागातील भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवा खंडित झाली होती. या अडचणीमुळे दिलेल्या मुदतीत खरेदीची लॉट एन्ट्री झाली नव्हती. त्यामुळे ३६७ शेतकऱ्यांची ५६९४ क्विंटल ज्वारी आणि ७२६ क्विटल मका खरेदीची लॉट एन्ट्री बाकी होती. मतदार संघातील शेतकऱ्यांचे सर्वांगीण हित लक्षात घेऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हलाखीची परिस्थिती पाहून तातडीने या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले आहे.