नांदेड - 56 दिवसांच्या लॉकडाऊनंतर नांदेडमध्ये आज काही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर आज सकाळपासून व्यापाऱ्यांची लगीनघाई पाहायला मिळाली. अनेक गरजू वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठ गाठली. त्यामुळे तब्बल 56 दिवसांच्या खंडानंतर बाजारात आज वर्दळ पाहायला मिळाली.
दरम्यान, दुकाने सुरू ठेवण्यासाठी सकाळी सात ते दुपारी दोन अशीच वेळ देण्यात आली आहे. त्यावर व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत ही वेळ वाढवण्याची मागणी केली. दुसरीकडे कापड विक्रेत्यांना दुकाने उघडण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे कापड विक्रेत्यांनी आम्ही नियमांचे काटेकोरपणे पालन करू पण आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी द्या अशी मागणी केली आहे. आज बऱ्याच दिवसानंतर दुकाने उघडल्याने रस्त्यावर रहदारी वाढलेली दिसली.