नांदेड - मुक्रमाबाद येथील संपादित 1 हजार 310 घरांचा मावेजा तत्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी लेंडी प्रकल्पग्रस्तांचे मंगळवार पासून आंदोलन सुरू आहे. आमदार डॉ. तुषार राठोड यांनी प्रशासन व प्रकल्पग्रस्त यांच्यात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना गुरुवारी 25 नोटीसा देण्यात येणार आहेत. तर उर्वरित वॉर्ड क्रमांक 1 मधील संपूर्ण प्रकल्पग्रस्तांना आठवडाभरात मावेजाच्या नोटीसचे वितरण करण्यात येणार असल्याची चर्चा बुधवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होती.
हेही वाचा - डॉ. तुषार राठोडांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये; भाजप कार्यकर्त्यांची चिखलीकरांना विनंती
आंदोलनादरम्यान बेमुदत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर बाजारपेठ दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंदच होती. शासनाच्या अधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांची बोलणी दुसऱ्या दिवशीही फिसकटल्याने प्रकल्पग्रस्त बुधवारी रात्री उशीरापर्यंत आंदोलनावर अडून बसले होते. त्यामुळे मुक्रमाबाद येथील बाजारपेठ सलग 2 दिवसांपासून बंद असल्याने लाखोंचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
हेही वाचा - ...अन्यथा गणेश विसर्जन करणार नाही, लेंडी प्रकल्पग्रस्तांचा पवित्रा
सलग दुसऱ्या दिवशी बेमुदत बाजारपेठ बंद व आंदोलन सुरूच राहण्याची 3 दशकातील ही पहिलीच घटना असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. बुधवारी या आंदोलनास भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, प्रहारचे आमदार बच्चू कडू, वंचित आघाडीचे शिवा नरंगले व विविध सामाजिक संघटना व अनेक पक्षांनी पाठिंबा दर्शवला. तर माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांनी आंदोलनस्थळी येऊन प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.
लेंडी प्रकल्पग्रस्तांचे 2 दिवसांपासून आंदोलन सुरु असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केल्यामुळे मुक्रमाबाद शहराला सलग दुसऱ्या दिवशीही छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.