नांदेड : अर्धापूर तालुक्यातील चोरंबा येथील तरुण दिव्यांग शेतकरी गजानन नरोटे यानी दिव्यांगात्वावर मात केली. त्यांनी स्वतःची तीन एकर शेती आणि दुसऱ्याच्या सात एकर शेतीमधून भरघोस उत्पन्न काढले. अनेक शेतकऱ्यांना त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे. स्वतः दोन पायांनी दिव्यांग असूनही १० एकर शेती तो करत आहे. यामध्ये केळी, हळद, ज्वारी, गहू व सोयाबीन पिके घेत आहेत. या मेहनतीमुळे दोन्ही पायाने दिव्यांग असूनही पायांवर उभा आहे, असेच म्हणावे लागेल.
सुरुवातीला अडचणींचा सामना : गजानन नरोटे बालपणापासून दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. त्याचे शिक्षण १२ पर्यंत झाले आहे. आईवडील यांच्याकडून शेतीमधील कामे होत नसल्याने, शेतीची व घराची जबाबदारी गजानन याच्यावर पडली. त्यामुळे त्याचे शिक्षण वर्धवट राहिले. पुढील शिक्षण थांबले. शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. दोन्ही पायांनी दिव्यांग असताना शेती करणे अवघड होते. परंतु त्यानी जिद्द चिकाटी अंगात असल्याने, शेतीमधील सर्व कामे करून दिव्यांगत्वावर मात करून शेतीमध्ये भरघोस उत्पन्न काढण्यास सुरुवात केली आहे. शेती करताना सुरुवातीला अडचणींचा सामना केला.
कालांतराने कामाची सवय : जिद्दीपुढे काहीही अशक्य नाही. दोन्ही पायांनी दिव्यांग असताना गजानन शेतीमधील सर्व कामे स्वतः करत आहे. पिकांना पाणी देणे, नांगरटी, पेरणी, निंदनी, खुरपणी आदी कामे करतो. तसेच त्याच्याकडे दुधाची तीन जनावरे आहेत. त्यांचे स्वतः दूध काढतो आणि बाजारात विकतो. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या बहिणींचे लग्न लावून दिले आहे. शासनाकडून चार्जिंगची तीनचाकी रिक्षा मिळल्याने गजाननचा हा प्रवास सोपा झाला.
समाजापुढे एक आदर्श निर्माण : रिक्षाने तो अर्धापूरला दूध विकतो, तसेच रिक्षावर बसून शेतामध्ये जातो. ११ वर्षांपासून दिवसरात्र मेहनत करून दोन बहिणीचे लग्न केले आहे.पुढील महिन्यात तिसऱ्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु आहे. हे सर्व त्यांनी स्वतः शेतीवरच केले. एकीकडे निराशेपोटी शेतकरी आत्महत्या करत आहे, तर दुसरीकडे दिव्यांग शेतकरी असलेला गजानन नरोटे यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला.