नांदेड - "राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टीवर राजकारण आहे. दोन्ही माझ्या जवळ नाहीत. जय महाराष्ट्र…जय राज साहेब… जय मनसे…" अशी चिठ्ठी लिहून किनवट येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षाने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना आज (रविवार) उघडकीस आली आहे.
सध्या राजकारणात घराणेशाही बरोबरच धनदांडग्या लोकांचीच अधिक गर्दी आहे. जाती-पातीच्या राजकारणात समाजकार्यातून सर्वसामान्य समाजातून पुढे येण्याचे प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची गोची होत असल्याचे अनेक प्रकरण समोर येत आहे. असे असताना किनवट येथील मनसेचे शहराध्यक्ष सुनील आनंदराव ईरावार यांनी आज रविवार रोजी पैसा आणि जात या समीकरणात आपला टिकाव लागत नसल्याने हताश होऊन आत्महत्या केली.
अत्यंत मनमिळाऊ, कुशाग्र बुद्धी व अत्यंत संयमी असलेल्या सुनील ईरावार यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.