नांदेड - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्यावतीने रातोळी येथे भाजपाचे आमदार राम पाटील-रातोळीकर यांच्या घरासमोर 'जागर आंदोलन' करण्यात आले. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हे आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी विविध मागण्या केल्या.
मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नासाठी लढाई करणार : आमदार राम पाटील रातोळीकर
मराठा आरक्षणाच्या न्याय, हक्कासाठी सभागृहात बाजू मांडून रान उठवणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार राम पाटील-रातोळीकर यांनी दिली. तसेच आरक्षणाबाबत सरकार गांभीर नाही, रस्त्यावर उतरून मराठा समाजाचा पाईक म्हणून तीव्र आंदोलन करून 100 टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असणार असेही रातोळीकर यावेळी म्हणाले. दरम्यान यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्यावतीने जागर आंदोलनावेळी विविध मागण्यांचे निवेदन आमदार रातोळीकर यांना देण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवसरकर, प्रदेश प्रवक्ते डॉ. बालाजी पेनुरकर, गजानन पाटील माने, विलास पाटील इंगळे, मंगेश पाटील कदम, सुनील मोरतोळीकर, बालाजी पाटील कदम, आदी उपस्थित होते.
- मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या -
- राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे घटनापीठ लवकर स्थापन करण्यासाठी अर्ज करावा
- घटनापीठ स्थापन झाल्यानंतर सुनावणी लवकर घ्यावी
- घटनापीठ स्थापन केल्यानंतर आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठवावी
- हे शक्य नसेल तर मराठा आरक्षण बाधित ठेवण्यासाठी नवीन अध्यादेश काढावा
- सारथी संस्था पूर्ववत सुरू करून सारथीचे कामकाज आणि विविध कोर्स पुन्हा सुरू करण्यासाठी 1 हजार कोटी रुपयाचा निधी द्यावा
- 22 जुलै 2020 पासून महाविकासआघाडी सरकारने परिपत्रक काढून आर्थिक दृष्ट्यादुर्बल घटकांच्या 100% आरक्षणातून मराठा समाजाला वगळण्याचा निर्णय घेतला तो रद्द करून मराठा समाजाला दिलासा द्यावा
- मराठा आरक्षणाबद्दल अध्यादेश निघेपर्यंत किंवा स्थगिती उठेपर्यंत मराठा समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणाची सर्व शैक्षणिक फी आणि खर्च सरकारने करावा
- ज्या युवकांना नोकरीच्या नियुक्त्या मिळाल्या त्यांची नियुक्ती कायम ठेवावी
- महाराष्ट्र शासनाची मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक भूमिका असेल तर मराठा आंदोलकांवर दडपशाही, हेरगिरी ठेवून त्रास देऊ नये