नांदेड - पीरबुऱ्हाणनगर कंटोन्मेंट झोनमधील १६ हजार ८८५ नागरिकांची थर्मल मशीनद्वारे स्क्रिनिंग करण्यात आली आहे. महापालिकेने या प्रभागात विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पीरबुन्हाणनगर येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने पीरबुऱ्हाणनगर व लगतचा परिसर कंटोन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
आतापर्यंत कंटोन्मेंट झोनमधील एकूण ३ हजार ८९२ घरांमधील १६ हजार ८५५ व्यक्तींची थर्मल मशीनद्वारे ताप, सर्दी, खोकला आदीची तपासणी करण्यात आली. कोरोनाबाधित व्यक्तीच्या परिवारातील ८ सदस्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील ४ व्यक्तींना एनआरआय यात्री निवास येथे क्वारंटाईन करण्यात आले.
मनपा उपआयुक्त (आरोग्य) सरदार अजिपालसिंघ संधू, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय पर्यवेक्षक,आशा वर्कर आणि परिचारिका कंटोन्मेंट झोनमध्ये उत्कृष्ट काम करत आहेत. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावे, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क किंवा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, उपमहापौर सतीश देशमुख यांनी जंगमवाडी येथील संग्राम पोमदे रुग्णालयात जाऊन आरोग्य सेवेची पाहणी करत योग्य त्या सूचना दिल्या.