नांदेड - मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे निकृष्ट दर्जाचे काम गावकऱ्यांनी बंद पाडल आहे. बिलोली तालुक्यातील आदमपूर ते गळेगाव या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. गळेगाव ते आदमपूर या रस्त्याच्या कामांसाठी निधी मिळाल्याने गावकरी समाधानी होते. मात्र रस्त्याचे काम करणारा ठेकेदार फक्त निधीची विल्हेवाट लावत होता.
आदमपूर ते गळेगाव या दोन किमी रस्त्याचे काम व्हावे, ही गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांची मागणी होती. अनेक वर्षाचा प्रतीक्षेनंतर एक वर्षापूर्वी 28 जून 2019 ला काम सुरू झाले होते. हे काम एक कोटी नऊ लाख रुपयांचे होते.
निकृष्ट दर्जाचे काम पाहून गावकरी आक्रमक-
हा रस्ता मोठ्या संघर्षानंतर मिळाल्यानंतर अंदाजपत्रकाप्रमाणे कुठेच काम झाले नाही. हा रस्ता सुरू असतानाच डांबरीकरणाचे भाग निघत आहेत. तर किती दिवस हा रस्ता टिकेल हा संशोधनाचा विषय आहे. दिलेल्या कालावधीतही हा रस्ता पूर्ण न झाल्यामुळे गावकरी चांगलेच संतापले आहेत. बेसुमार दर्जाचे होत असलेले काम पाहून गावकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत.
गावकऱ्यांच्या अनेक तक्रारी गेल्यानंतर अभियंत्यांनी कामाची पाहणी करत ठेकेदाराला तंबी दिली आहे. रस्त्याचे खराब झालेलं काम पुन्हा नव्याने चांगलं करावे, असे ठेकेदाराला सांगण्यात आले. या रस्त्याचे काम जोवर चांगले होणार नाही तोवर आम्ही काम होऊ देणार नाही, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा- वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्या; अन्यथा महावितरण कार्यालयांना टाळे ठोकू