नांदेड- राज्यभरात लॉकडाऊनचे निर्बंध असताना नांदेडमध्ये अवैध रेती उपसा जोरात सुरू आहे. बहुतांश रेती घाटावर अवैध रेतीचा उपसा सुरू आहे. मात्र, लोहा तहसिल प्रशासनाने कारवाईचा दिखावा करत २१ तराफे जाळले आणि केवळ दोन ब्रास रेती जप्ती दाखवली आहे. यामुळे या करवाईकडे संशयाच्या दृष्टीने पाहिले जात आहे.
लॉकडाऊन निर्बंधाची अंमलबजावणी की फज्जा
राज्यभरात लॉकडाऊनचे निर्बंध सुरू असताना नांदेडमध्ये मात्र काहीसं वेगळ चित्र आहे. गोदावरी नदी घाटावर रेती उपसा जोरात सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू असतांनाही प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. कोरोनाबाधीतांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. शहरासह जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र बहुतांश ठिकाणी त्याचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन असतानाही रेती घाटावर मात्र उलट परिस्थिती आहे. पिंपळगाव, भनगी, निमजी, चाहेगाव यासह विविध रेती घाटावर दिवसरात्र रेतीचा उपसा सुरू आहेत. रेती उपसा करण्यासाठी तराफे वापरण्यात येत असून एकावेळेस एका रेती घाटावर २० ते २५ तराफे सुरू आहेत. यावरून अवैध रेती उपसा लक्षात येते.
गोदावरी नदी घाटात रेती उपसा जोरात
लोहा तालुक्यातील भारसावडा व चित्रावाडी येथे २४ एप्रिल रोजी २१ तराफे नष्ट केले व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसिलदारांनी बोटच्या माध्यमातून गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपसाची पाहणी केली असता भारसावडा व चित्रावाडी या परिसरामध्ये एकंदरीत २१ तराफे अवैध रेती उपसा करतांना आढळून आले. ताराफ्याच्या सहाय्याने शेकडो ब्रास रेती काढली जात आहे.
लोहा तहसिलदारांची कारवाई
महसूल प्रशासनाने फौजफाट्यासह तत्काळ हे २१ तराफे ताब्यात घेवून नष्ट केले. तसेच तहसिलदार विठ्ठल परळीकर यांच्या तक्रारीवरुन हायवा चालक व मालक गजानन कोंडीबा कऱ्हाळे ( २८ ) रा. आंतेश्वर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायवा ट्रक रुपये अंदाजे २५ लाख १० हजार रुपये व दोन ब्रास रेती १० हजार रुपये असा एकूण २५ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध रेती उपसावर लोहा तहसील प्रशासनाने कारवाई केली. मात्र, याकडे संशयाने पाहिले जात आहे.
कारवाईची गोपनीय माहिती फुटली
रेती माफीयांवर कारवाई करताना महसूल प्रशासनाला पूर्व तयारी करावी लागते. पोलीस बंदोबस्त, लेबर, जप्त केलेली रेती उचलण्यासाठी वाहन, जेसीबी, यांची व्यवस्था करावी लागते. यासाठी वेळ देखील लागतो. मात्र, ही कारवाई करण्यापूर्वी रेती माफियांना याची चाहूल लागली आहे. गोपनीय माहिती फुटल्यामुळे अनेक तराफे नदीतून बाहेर काढले जात आहेत. यामुळे या कारवाईचा म्हणवा तसा परिणाम होताना दिसत नाही. लोहा तालुक्यातील भारसावडा व चित्रावाडी येथे २१ तराफे जाळून कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीत केवळ दोन ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. यामुळे करवाईवर संशय व्यक्त केला जात आहे.