नांदेड- शेतजमीन मुलाच्या नावे फेरफार करुन सातबाऱ्यावर नोंद करून घेण्यासाठी तलाठ्याने पंधरा हजाराची लाच घेतली. याप्रकरणी हिमायतनगर सज्जाचे तलाठी रामचंद्र पुरी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
तक्रारदाराच्या नावावरील शेतजमीन मुलाच्या नावे फेरफार करुन तिची सातबारा नोंद घेण्यासाठी हिमायतनगर सज्जाचे तलाठी रामचंद्र मच्छिंद्रनाथ पुरी याने तक्रारदाराकडे वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तलाठी पुरीने वीस हजार रुपयांची मागणी केली असता, तक्रारदार शेतकऱ्य़ाने असमर्थता दाखवल्यावर शेवटी पंधरा हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. ती रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी तलाठी पूरी यांच्या खासगी कार्यालयात सापळा रचून पुरी याला पंधरा हजार लाचेची मागणी करुन ती स्वीकारताना रंगेहात पकडले.
या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहूल पखाले, पोलिस नाईक बालाजी तेलंगे, हनुमंत बोरकर, गणेश तालकोकुलवार, गणेश केजकर, नरेंद्र बोडके यांच्या पथकाने केली.