नांदेड: जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपीटीमुळे शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील साडेपाच हजार हेक्टरहून अधिक शेतातील पीक मातीमोल झाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. तरीही त्यांना शासनाची कुठलीच मदत मिळाली नसून याआधी झालेल्या गारपिटीच्या नुकसान भरपाईचे पैसे अजूनही मिळाले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या; पण पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्याचा पाणी दौरा केला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्याप्त आहे.
पालकमंत्र्यांविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये रोष: नायगाव तालुक्यातील 89 गावांमध्ये जाऊन 'पालकमंत्री शोधा व अकराशे रुपये मिळवा' अशा आशयाचे पोस्टर लावल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री गिरीश महाजनांच्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यासाठी सर्वांत कमी वेळ देण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या तसेच स्थानिक मोठ्या प्रश्नांकडे पालकमंत्री लक्ष देत नसल्याच्या तक्रारी मागील अनेक दिवसांपासून येत आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये पालकमंत्र्यांविरुद्ध रोष आहे. पालकमंत्री महाजन नांदेडला आले तरी ते पक्षाच्या व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातच व्यस्त असतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानीचे मोबदले द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महाजनांच्या गाड्यांचा ताफा अडविला: नांदेडमधील उस्मानशाही मिल या रोडला 60 वर्षांपूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले होते; मात्र महापालिकेने ते नाव बदलल्याने आंबेडकरी समाजात नाराजी पसरली होती. पालकमंत्री महाजन 4 नोव्हेंबर, 2022 रोजी नांदेड दौऱ्यावर झेंडा घेत महाजन त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला होता.
गुलाबराव पाटलांविरुद्ध पोस्टरबाजी: बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पालकमंत्री पद मिळाल्यापासून ते जिल्ह्यात फक्त 2 वेळा येऊन गेले. त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, शेतकरी खचून गेला तरीही पालकमंत्री जिल्ह्यात फिरकले नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पालकमंत्री बेपत्ता झाल्याचे ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. यामध्ये पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्यास 51 रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले गेले. असे पोस्टर लागल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रोष: शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाही. त्यातच तुरीची खरेदी देखील बंद आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे अद्यापही रखडले आहेत. त्याकरिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष घालावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ते बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात मागील महिना भरापासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. हजारो हेक्टर शेतीसह ठिकठिकाणी घरांची पडझड आणि नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील अद्याप शेताच्या बांध्यावर फिरकले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रोष व्यक्त केला आहे.
हेही वाचा: Aaditya Thackeray Letter : 'नवा दिवस, नवी लूट'; आदित्य ठाकरेंचे मुंबई मनपा आयुक्तांना आणखी एक पत्र