नांदेड - जिल्ह्यातील बळीराजा गेल्या ४ वर्षांपासून दुष्काळाच्या 'चक्रव्यूहात' अडकला आहे. एकीकडे आस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी संकटाने बळीराजा बेजार झाला आहे. सध्या पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. बँकाही शेतकऱ्यांना दारात उभे राहू देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर सावकारांकडून 'अव्वाच्या सव्वा' व्याजदराने कर्ज घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा सावकारी पाशात अडकत चालला आहे.
जिल्ह्यात केवळ ९.७० टक्केच पीककर्जाचे वाटप
बँकानी कर्ज न दिल्यास त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात याचा काहीच उपयोग झाल्याचे दिसून येत नाही. रब्बी हंगामात तर नांदेड जिल्ह्यात केवळ ९.७० टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. रब्बी हंगामात तर नेहमी शून्य टक्केच वाटप असते.
जिल्ह्यात खरीप हंगामात १ हजार ९६७ कोटी रुपयांच्या पीक विम्याचे उद्दीष्ट असताना केवळ १९० कोटी इतकेच पूर्ण केले आहे. भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यासह २८ बँकांनी पीककर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. खरीप हंगामात दरवर्षी बँकांकडून कर्ज वाटप करण्यात येते. पण कर्जमाफीच्या गोंधळामुळे बँका नकारघंटा देत वेळ काढत आहेत. कर्जमाफीचा लाभ मिळेल या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांचे कर्ज थकीत खात्यात गेले आहे. पण शासनाकडून मात्र, केवळ घोषणाच असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही.
काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. पण, बँका मात्र स्वतःची वसुली करून घेऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देत आहेत. कर्जाचा आकडा दीड लाखाच्यावर असेल तर शेतकऱ्यांना त्यापेक्षा जास्त रक्कम भरावी लागत आहे. मोठ्या अडचणीतून ही वरची रक्कम भरल्यानंतर अचानकपणे अनेक बँकांनी सदरील कर्ज नाकारल्याचे शेतकरी सांगत आहेत. बँकेच्या कर्जाच्या बाबतीत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
बँका शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहेत
काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. पण बँका मात्र, स्वतःची वसुली करून घेत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देत आहेत. कर्जाचा आकडा दीड लाखाच्यावर असेल तर शेतकऱ्यांना त्यापेक्षा जास्त रक्कम भरावी लागत आहे. मोठ्या अडचणीतून ही वरची रक्कम भरल्यानंतर अचानकपणे अनेक बँकांनी सदरील कर्ज नाकारल्याचे शेतकरी सांगत आहेत. बँकेच्या कर्जाच्या बाबतीत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
खतांच्या दरामध्ये मोठी वाढ
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खतांच्या दरामध्येही मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी बँक हा मोठा आधार होता. त्यांनीही धोका दिला.
सावकरांकडून अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज
जिल्ह्यात नोंदणीकृत अंदाजे २०० च्या आसपास खासगी सावकार आहेत. खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याजदरात पैसे घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नोंदणीकृत जरी नसले तरी प्रत्येक गावागावात अनधिकृत सावकार असून, शेतकऱ्यांची लूट करण्यात त्यांना रान मोकळे झाले आहे. तसेच शेतकऱ्यांना कुठलाही पर्याय सध्या शिल्लक नसल्याचे गंभीर चित्र समोर दिसत आहे. एकीकडे नैसर्गिक संकट तर दुसरीकडे पेरणीसाठी पैसा नाही. शासनाकडून याबाबतीत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्ह्यात केवळ १०.०६ टक्केच कर्जवाटप
नांदेड जिल्ह्यातील बँकांना यंदा १ हजार ९६७ कोटी ५१ लाख रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील बँकांनी दि. २२ जून पर्यंत ३७ हजार ९९५ शेतकऱ्यांना १९७ कोटी ९८ लाख रुपये (१० . ०६ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील (राष्ट्रीयीकृत) बँकांना १ हजार ३६० कोटी ७ लाख रुपयांचे उद्दीष्ट आहे. त्यांनी ३ हजार ३७९ शेतकऱ्यांना २७ कोटी ५६ लाख रुपये (२.०३ टक्के) वाटप केले. खासगी बँकांनी १५१ कोटी ६७ लाख रुपये उद्दिष्टापैकी ८८६ शेतकऱ्यांना केवळ २० कोटी ७२ लाख रुपये वाटप केले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २७७ कोटी १७ लाख रुपयांपैकी २ हजार ८४७ शेतकऱ्यांना २२ कोटी ४७ लाख रुपये (८ .११ टक्के) पीक कर्जवाटप केले. जिल्हा बँकेने १७८ कोटी ६० लाखांपैकी ३० हजार ८८३ शेतकऱ्यांना १२७ कोटी २३ लाख रुपये (७१.२४ टक्के ) वाटप केले आहे.
मागील वर्षातील रासायनिक खताचे दर
मागील वर्षात डी.ए.पी. खताची एक बॅग १ हजार २८० रुपये, १०:२६:२६ खताची किंमत १ हजार १८३ रूपये, १२:३१:१६ खताची बॅग १ हजार ३५० रूपये, २०:२०:१३ खताची किंमत ९१० रुपये, पोटॅश खत ७२० रुपये, १६:१६:१६ एक बॅग ९७१ रुपये, १२:३२:१६ एक बॅग १ हजार २५० रुपये, एस.एस.पी.जी. ३५० रुपये, एस.एस.पी.- पी ३२० रुपये याप्रमाणे होती. तर युरियाची ५० किलोची बॅग २९५ रुपये होती. परंतु, या वर्षात ही बॅग ५० ऐवजी ४५ किलो करण्यात आली आहे. त्यामुळे युरियासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.
यंदा खताची असलेली किंमत
यंदा युरिया वगळता सर्वच खताच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामध्ये डी.ए.पी. १ हजार ४०० ते १ हजार ४५० रुपये, १०:२६:२६ एक बॅग १ हजार ३७० रुपये, १२:३२:१६ एक बॅग १ हजार ३५० रूपये, २०:२०:१३ एक बॅग १ हजार ६५ रुपये, १६:१६:१६ एक बॅग १ हजार ८५ रूपये, एस.एस.पी. - जी. एक बॅग ३८० रूपये, एस.एस.पी. - पी एक बॅग ३५० रुपये, १२:३२:१६ एक बॅग १ हजार ४२० रूपये, तर पोटॅश खत ९५० रुपये प्रती बॅग याप्रमाणे किंमती वाढल्या आहेत. मागील वर्षापेक्षा या वर्षात खताच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.