नांदेड - गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या रिमझिम पावसाने तोडणीला आलेल्या मूग, उडीद पिकांच्या शेंगांना मोड फुटले आहेत. पुन्हा हाता तोंडाला आलेला घास जातो की काय या भीतीने शेतकरी धास्तावला आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पाऊस होत आहे. काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर काही भागात सतत रिमझिम स्वरुपात पाऊस होत आहे. सोयाबीन, हळद, कापूस पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त असला तरी मूग व उडीद या पिकांना पाऊस मारक ठरला आहे.
यंदा नांदेड जिल्ह्यात सोयाबीन, मूग, उडीद पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. परंतु, सोयाबीनचे बोगस बियाणे निघाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे कर्जबाजारी व्हावे लागले. दुबार पेरणी केल्यावर मूग, उडीद पिकांना बऱ्यापैकी शेंगा लागल्या व त्या तोडणीस आल्याने शेतकरी आनंदीत झाला होता. मात्र, गेल्या मागील आठवडाभरापासून सततच्या रिमझिम पावसामुळे तोडणीस आलेल्या मूग, उडीद पिकांच्या शेंगांना आता मोड फुटले आहेत. यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास पुन्हा जातो की काय या भितीने शेतकरी धास्तवला असून त्याचे आर्थिक कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.
मूग व उडीद या पिकांची विमा कंपनी व प्रशासने त्वरित पाहणी करून पंचनामे करावेत व आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. सतत चार वर्षांपासून शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहे. यंदा पाऊस समाधानकारक झाला असलातरी शेतकरी समाधानी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसात मोठ्या जोमाने शेतकऱ्यांनी पेरणी करून खरीप हंगामाचा शुभारंभ केला होता. मात्र, सोयाबीनच्या बोगस बियाण्यांनी धोका दिला. यामुळे काही ठिकाणी दुबार तर काही भागात शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली होती. आता सततच्या रिमझिम पावसाने मूग व उडीद पीक धोक्यात आले आहे.