नांदेड - एप्रिल व मे महिन्यामध्ये नांदेड शहरासाठी लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेवून विष्णुपुरी जलाशयातील पाणी साठ्याचा अनियंत्रीत उपसा होवू नये यासाठी विष्णुपूरी प्रकल्पाच्या दोन्ही तीरावरील एक्सप्रेस फीडरचा वीजपुरवठा बुधवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या वतीने कळविण्यात आले आहे.
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकासाठी विष्णुपूरी जलाशयातील ३६.५० दलघमी पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले आहे. विष्णुपूरी जलाशयावरील दोन्ही तिरावरील शेतकऱ्यानी बसविलेल्या कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडीत केला तरच अनधिकृत उपशावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. विष्णुपूरी जलाशयात आज रोजी २८.६७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे माहे एप्रिल व मे महिन्यात तसेच पुढील काळात पाणीसाठा उपलब्ध असणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्देशानुसार बुधवारी मध्यरात्रीपासून पंधरा दिवसांकरिता, म्हणजेच १६ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत विष्णुपूरी जलाशयाच्या दोन्ही तीरावरील एक्सप्रेस फीडरचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.
२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामीण व नागरी भागासाठी पाणी टंचाईच्या अनुशंगाने करावयाच्या उपाययोजनांसंबंधीच्या बैठकीमध्ये विष्णुपूरी जलाशयाच्या एक्सप्रेस फीडरचा वीजपुरवठा ३० एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने महावितरणने निर्णय घेतला आहे.