नांदेड- सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना गंगाबेट येथे घडली. याप्रकरणी सासरच्या मंडळीवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- 'शिवसेनेशिवाय राज्यात सरकार नाही व मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच'
नांदेड तालुक्यातील गंगाबेट येथे राहणाऱ्या ज्योती राधाजी सोनटक्के (वय २२) यांना सासरी नाहक त्रास होता. तिने जन्माला घातलेली मुलगी ही अनैतिक संबंधातून झाली, असे म्हणून तिचा छळ करणे सुरू केले. एवढेच नाही तर लग्नात ठरल्याप्रमाणे हुंडा मिळाला नाही. तो आता परत घेऊन ये म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ सासरकडून सुरू होता. तसेच तिला उपाशी ठेऊन घरातून हाकलून देण्याची धमकी देण्यात आली होती, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
या त्रासामुळे तिने शनिवारी (दि. १६) रात्री आपल्या पतीला व अन्य मंडळीला 'तुम्ही जो माझ्यावर आरोप लावता तो चुकीचा असून मला सासरी सुखाने राहू द्या,' अशी विनंती केली. मात्र, सासरच्या मंडळीच्या वागण्यात काही फरक पडला नाही. शेवटी रविवारी पहाटे दोनच्या सुमारास आपल्या राहत्या घरी अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. तिला सासरच्या मंडळींनी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर भाजल्याने तिचा उपचारादरम्यान रविवारी दुपारी बाराच्या सुमारास मृत्यू झाला. यानंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी रुग्णालयात धाव घेतली. उत्तरीय तपासणीनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार झाले. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. यू. थोरात करीत आहेत.