नांदेड - राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील संशयित रूग्णांची तपासणी नांदेड येथेच करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेचा वापर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरच नांदेडमध्येच कोरोना संशयिताची तपासणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत असल्यामुळे. आज (मंगळवारी) नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील खातेप्रमुख उपस्थित होते.
बैठक आटोपल्यानंतर पालकमंत्री चव्हाण माध्यमांशी बोलत होते. चव्हाण म्हणाले, की नांदेड जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नसून भविष्यातही नांदेडमध्ये प्रार्दुभाव होऊ नये, यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. गरजुंना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शिवाय आमदार राजूरकर यांच्यासह आपण ५० लाख रुपयांचा आमदार निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.