नांदेड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, कोंचिग क्लासेस, व्यायामशाळा, मंगल कार्यालये, सिनेमागृहे, नाट्यगृहे पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी दिले आहेत. डॉ. विपीन इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी निजी कक्षामध्ये त्यांनी बैठक घेतली होती. या बैठकित ते बोलत होते.
या बैठकीस निवासी उपजिल्हााधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सकक डॉ. निळकंठ भोसीकर, बा.क. जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही. शिंगणे, जिल्हा महिला बाल कल्यााण अधिकारी श्रीमती आर. पी. काळम, उपशिक्षणाधिकारी (मा) माधव सलगर, कोचिंग क्लासेस, व्यायामशाळा, मंगल कार्यालय चालक-मालक यांच्यासह विविध अधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1 दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू केला आहे. सदरील कायद्याची दिनांक १४ मार्च २०२० पासून महाराष्ट्र 'कोव्हीड-१९' उपाययोजना नियम २०२० लागू केलेली आहे. त्यानुसार महानगरपालिका, सर्व नगरपालिका, सर्व नगर पंचायत क्षेत्रातील, सर्व सरकारी व खाजगी अंगणवाड्या, सर्व सरकारी व खाजगी शाळा, तसेच महाविद्यालय, आयुक्त व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे याच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्था दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याबाबत सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याकरिता नांदेड जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक राजकीय धार्मिक क्रिडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध करण्यात आलेला आहे. यापुर्वी वरील कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता सदर परवानगी रद्द करण्यात आली असल्याचे सांगितले.
हेही वाचा -कोरोना संशयिताला नांदेड शासकीय रुग्णालयातून हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात हलवले
नांदेड जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा समान, दुध, भाजीपाला, औषधी दुकाने व अन्य जीवनावश्यक वस्तू वगळून) दि. ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी सांगितले.
कोणत्याही व्यक्तीस, संस्था, संघटनांना करोना संसर्गाबाबत अफवा अनाधिकृत माहिती इलेक्ट्रॅानिक किंवा सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. याचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरुध्द कायदेशिर व दंडनिय कारवाई करण्यात येईल, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी यावेळी दिल्या.
मागील १४ दिवसांत ज्या व्यक्तींनी कोरोनाबाधित देशातून प्रवास केलेला आहे, त्यांनी स्वत: याबाबतची माहिती कोरोना नियंत्रणासाठी राज्य नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 020-26127394, एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प कक्ष 020-27290066 व टोल फ्री क्रमांक 104 किंवा जिल्हा रुग्णालय नांदेड येथील नियंत्रण कक्ष 02462-249279 संपर्क साधावा.
कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून आल्यास संशयित रुग्णांना शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती होणे आवश्यक आहे. त्यास मज्जाव, प्रतिबंध, अडथळा आणण्याविरुध्द दंडनिय कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
हेही वाचा -नांदेडात रेती माफियांवर वचक बसविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाळले तराफे