नांदेड - जिल्हा परिषदेत आज ४ विषय समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे. या पदांसाठी अनेक जण इच्छुक असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अशोक चव्हाण रविवारीच शहरात दाखल झाले आहेत.
हेही वाचा - लग्न समारंभावरून परतणाऱ्या वऱ्हाडाचा अपघात; दहा ठार, तर 7 गंभीर
जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीच्या प्रयोगानंतर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जाईल, असे अपेक्षित असताना या पदावर शिवसेनेने ताबा मिळविला. यामुळे राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी विषय समिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसमध्येही सभापतीपद मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्यांची संख्या मोठी आहे. सभापतीपदासाठी निर्माण झालेल्या चुरशीतून मार्ग काढण्याचे प्रयत्न काँग्रेस पुढाऱ्यांकडून केले जात असले, तरी अंतिम निर्णय पालकमंत्रीच घेतील, असे सांगितले जात आहे.
हेही वाचा - अंत्यविधीला जाताना काळाचा घाला; सांगलीजवळ विहिरीत गाडी पडून 5 जणांचा मृत्यू
जिल्हा परिषदेत संख्याबळ महाविकासआघाडीच्या बाजूने आहे. सभापतीपदासाठी प्रकाश देशमुख आणि बाळासाहेब रावणगावकर यांच्यात काट्याची टक्कर सुरू असल्याचे सध्या चित्र आहे. याशिवाय काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्या सुशीला बेटमोगरेकर, संजय बेळगे, अॅड. रामराव नाईक, गंगाप्रसाद काकडे, अरूणा कल्याणे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संगीता मॅकलवाड, सुनैना जाधव, सुनंदा दहिफळे यांची नावे चर्चेत आहेत. ४ सभापती पदांसाठी १० जण इच्छुक असल्याने सभापतीपदी कोण विराजमान होणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उपाध्यक्षा सतपलवार यांच्याप्रमाणे नवीन चेहऱ्यांना सभापतीपदाची लॉटरी लागते, की यासाठी रांगेत असलेल्यापैकी चौघांना पदावर बसविले जाते याबाबतचे चित्र आज स्पष्ट होईल.