अर्धापूर (नांदेड) : कोरोनाचे संकट आणि कडक उन्हाळा, यामुळे रक्तदान शिबिरे सध्या होत नाहीत. त्यामुळे नांदेड येथील शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाली होती. शासकीय रुग्णालयातून येळेगाव येथील काही तरुणांना त्यामुळे रक्तदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. या तरुणांनी यासाठी तातडीने होकार दिला. काही वेळात अनेक तरुणांनी एकत्र येत रक्तदान केले. त्यामुळे आम्ही शेतकरी अन्न तर पुरवतोच त्यासोबत रक्तदानही करतो, असा संदेश या शेतकरी पुत्रांनी दाखवून दिला आहे. शासकीय रक्तपेढीकडून त्यांचे आभार मानण्यात आले.
हेही वाचा... दारू म्हणजे कोरोनाची लस नव्हे; संकटाचे भान ठेवा
अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथे बुधवारी एक रक्तदान शिबिर संपन्न झाले. तरुणांसह गावकऱ्यांनी रक्तदान करून त्यात मोठा सहभाग नोंदवला. सदरील रक्त शासकीय रक्तपेढीतून गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या कामी येणार आहे. शासकीय रुग्णालयाच्या वतीने सदरील शेतकरी तरुणांचे आभार व्यक्त करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी गोविंद कोकाटे, अमोल कपाटे प्रभू कपाटे, आत्माराम कपाटे, दशरथ कपाटे, अशोक कपाटे यांसह अनेक तरुण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.