नांदेड - काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देणे हे 21 व्या शतकातील आश्चर्यच आहे. अशोक चव्हाण यांनी म्हटल्याप्रमाणे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते सत्तेत गेले. मुंबईच्या शक्तीशाली मातोश्रीचा शक्तीपात झाला आणि दिल्लीची मातोश्री शक्तीशाली झाली, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. आज शुक्रवारी ते नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते.
शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून अडचण नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. 'देर आये दुरुस्त आये; सुबह का भूला श्याम को आया', असे आम्ही समजू, असे मुनगंटीवार म्हणाले. त्याचबरोबर मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही. तसा प्रस्तावही मनसेकडून आलेला नाही. मात्र, समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपची भूमिका आहे, असे सांगत त्यांनी मनसेबाबत भाजपचे मत अनुकूल असल्याचेही अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवले.
भिन्न विचारांचे सरकार दीर्घकाळ टिकत नाही, असा इतिहास आहे. हे तीन पक्ष रागापोटी एकत्र आले आहेत. तेव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला. तसेच या सरकारची स्थिती व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णासारखी आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.