नांदेड - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा आज दुपारी 1 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यामध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचीही मंत्रिपदी वर्णी लागली आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह सात जणांचा समावेश करण्यात आला होता.
हेही वाचा - शेतीच्या वादातून शेतकऱ्याची आत्महत्या, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अशोक चव्हाण हे काँग्रेसचे निष्ठावान आणि दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावरच चव्हाण यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, तेव्हा काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे दोन्ही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना वाट पाहावी लागली होती.
हेही वाचा - दैव बलवत्तर म्हणून वाचले पन्नास भाविकांचे प्राण!
मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारात अशोक चव्हाण यांची वर्णी लागणार हे निश्चित झाले आहे. अशोक चव्हाण यांनी याआधी राज्याचे मुख्यमंत्रिपदही भूषवले आहे. त्यामुळे त्यांना सन्मानजनक खाते देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना ऊर्जा किंवा सार्वजनिक बांधकाम खाते दिले जाण्याची शक्यता आहे.