नांदेड - महाराष्ट्राची लोककला म्हणून तमाशाला मान होता. तमाशाच्या माध्यमातून प्रबोधन होत होते. मात्र, बदलत्या काळात ही लोककला लोप पावत चालली आहे. तमाशा केवळ करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जात आहे. बदलत्या काळानुसार रसिकांच्या अपेक्षा देखील बदलल्या आहेत. आता फक्त तमाशामध्ये प्रेक्षकांची हुल्लडबाजी सुरू असते. तसेच कलावंतांना पोलिसांच्या दमदाटीला देखील सामोरे जावे लागतेय. त्यामुळे तमाशा कलावंत हिरामण बडे तमाशावर आलेल्या संकटाचे वर्णन करताना म्हणतात, ''माणूस मुकला माणुसकीला, नियत गमावली वाचेवारी दुनिया बिघडली''
माळेगाव यात्रेत कला महोत्सव, लावणी महोत्सव यासारख्या लोककलांचे सादरीकरण केले जाते. दरवर्षी महाराष्ट्रातून तमाशा फड माळेगावात येतात. आपली कला सादर करतात. वगसम्राट हरिभाऊ बडे नगरकरसह ढोलकी सम्राज्ञी शिवकन्या बडे यांच्या फडाची माळेगाव यात्रेत आवर्जून हजेरी असते. वयाच्या दहाव्या वर्षांपासून हिरामण बडे तमाशा सारखी लोककला सादर करतात. हरिभाऊ बडे यांची पाचवी पिढी महाराष्ट्राची लोककला टिकली पाहिजे यासाठी लढत आहे. पूर्वी तमाशा सकाळी ४ वाजेपर्यंत चालायचा. प्रेक्षक देखील शांत बसून ऐकायचे. आता ते दिवस राहिले नसल्याचे हिरामण बडे यांनी सांगितले.
पारंपरिक तमाशामध्ये गण (खेळाच्या सुरुवातीची गणेशाला केलेलं नमन), गवळण (कृष्ण आणि गोपीमधल्या संवादावरचं नृत्य), बतावणी (विनोदी प्रवेश), रंगबाजी (नृत्यमाला) आणि वगनाट्य (पुराणातल्या घटनांवरचं किंवा सध्याच्या सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारं लोकनाट्य) असे सगळे असते. मात्र, बदलत्या काळात रसिकांना काही वेगळीच अपेक्षा असते. त्यामुळे तमाशाचे स्वरूप बदलले आहे. प्रेक्षकांची हुल्लडबाजी सुरू असते. त्यात पोलिसांचा त्रास देखील तमाशा कलावंतांना होतो. तमाशा सुरू कण्यासाठी पोलिसांना दर दिवशी १० हजार रुपये द्यावे लागतात, अशी व्यथा लोककलाकार शिवकन्या बडे यांनी मांडली. तमाशा सुरू ठेवण्यासाठी आम्ही पोलिसांना कुठून पैसे देणार? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
कोणतीही कला राजाश्रय मिळाले तर विकसित होते. तमाशा कलाकारालाही मदत हवी आहे, तरच ही लोककला पुढे सुरू राहील. नाहीतर तमाशा ही लोककला नाहिशी होण्याची भीती कलावंतांनी व्यक्त केली आहे.