नांदेड - नांदेडमध्ये निर्बंध लावूनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता विनाकारण फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पालिका आयुक्त रस्त्यावर उतरले आहेत. कारण नसताना बाहेर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची जागेवरच अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. शहरातील राज कॉर्नर आणि वजीराबाद चौकात या अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहेत. आज या परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी वाहने आडवून रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या अँटीजेन टेस्ट करायला लावल्या.
पॉझिटिव्ह आढळल्यास विलगीकरण कक्षात रवानगी
आज दिवसभरात अनेक वाहनचालकांच्या टेस्ट करण्यात आल्या, त्यामध्ये रिक्षाचालकांची संख्या जास्त होती. दरम्यान टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास त्याची रवानगी विलगीकरण कक्षात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराच्याबाहेर पडू नये, कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - नूतन वर्षात काय घडणार ? चंद्र-मंगळ पिधान युती व दोन वेळा सुपरमून दिसणार !