नांदेड - देगलूरनाका भागातील मुजाहिद चौक येथे २५ मार्च रोजी झालेल्या हाणामारी व गोळीबाराच्या घटनेतील जखमी व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृत्यू पावलेल्यांची संख्या आता दोन झाली असून घटनेतील प्रमुख आरोपी अजुनही फरार आहेत.
कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी सगळीकडे लॉक डाऊन व संचारबंदी लागू असतांना देगलूरनाका भागातील मुजाहिद चौकात २५ मार्च रोजी दुपारी दोन गटांमध्ये हाणामारीची घटना घडली. यामध्ये मोहंमद जुनेद या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, शेख सिराज शेख मौला, मोहंमद हाजी, मिनाजोद्दीन हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी सात जणांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी मोहंमद हाफिजोद्दीन इनामदारला (वय ७०) अटक केली असून इतर सहा आरोपी फरार झाले आहेत. दोन्ही गटामध्ये झालेल्या भांडणात चाकू, तलवारींच्या वापरासह गोळीबारही करण्यात आला होता. या घटनेतील जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान शेख सिराज शेख मौला (वय ३८) रा. हबीबीया कॉलनी, नांदेड याचा मृत्यू झाला असून घटनेतील मृत्यूची संख्या दोन झाली आहे. तर, फरारी आरोपी अजूनही नांदेड ग्रामीण पोलीसांना सापडले नाहीत. गोळीबार करणारी रिव्हॉल्वरही नांदेड ग्रामीण पोलीसांनी जप्त केली नाही. एवढी मोठी घटना घडूनही या गुन्ह्याचा तपास मात्र संथगतीने सुरू आहे.