नांदेड : शहरातील सभेची संपूर्ण तयारी झाली असून पन्नास हजार नागरिक बसतील असे मंडपाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 50 हजार खुर्च्या टाकण्यात आले आहेत. त्यातच स्टेजवर मोठे एलसीडी स्क्रीन लावण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी जागोजागी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांना व नागरिकांना व अन्नदानाची व्यवस्था ही करण्यात आली आहे.
अमित शाह यांची सायंकाळी चार वाजता नांदेड शहरातील गुरुद्वारा मैदान, अबचलनगर येथे विशाल सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भागवत कराड, पालकमंत्री गिरीश महाजन आदी नेते उपस्थित राहणार आहेत. या विशाल सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खासदा प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी केले आहे.
मोदी सरकारच्या कामगिरीचा मांडण्यात येणार लेखाजोखा: सभेच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारला ९ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त भाजपन महाजनसंपर्क अभियान सुरू केले आहे. केंद्र सरकारच्या कामगिरीचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जाहीर सभा अबचलनगर मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
भव्य मंडप बांधण्यात आला: खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे आहे. सभेला जवळपास ५० हजार जनसमुदाय उपस्थित रहावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जाहीर सभेसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. अबचलनगर येथील मैदानावर भव्य मंडप उभारला जात आहे.
ड्रोन उडविण्यास बंदी: जाहीर सभेच्या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने ९ जून ते दि. १० जून २०२३ या काळात विमानतळ परिसर व जाहीर सभेच्या परिसरात ड्रोन उडविण्यास पोलीस प्रशासनाने बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिला आहे.
वाहनांसाठी वेगळी पार्किंग व्यवस्था: सभेसाठी येणाऱ्या वाहनासाठी लोहा कंधार तालुक्यातील येणाऱ्या वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था नवीन कवढा लंगर साहेब गुरुद्वारा, साईबाबा कमानीजवळ केली आहे. तर देगलूर मुखेड बिलोली तालुक्यातून येणाऱ्या वाहनाची पार्किंग व्यवस्था केळी मार्केट, इतवारा मैदान नांदेड येथे केली आहे. भोकर, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, नायगाव या भागातून येणाऱ्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था खालसा हायस्कूल मैदान येथे केली आहे. नांदेड शहरातील वाहनाची पार्किंग यात्री निवास गुरुव्दारा नांदेड येथे केली आहे.
नांदेडच्या सभेचे आहे महत्त्व- बीआरएसचे अध्यक्ष, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनीदेखील नांदेडमध्ये सभा घेतल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा नांदेड हा बालकिल्ला आहे. त्यामुळे भाजपकडून या बालेकिल्ल्यात मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. मराठवाड्यात आजवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्यात वजन वाढविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा-