नांदेड - नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने ढोल बजावो आंदोलन सुरू होते. या आंदोलनकर्त्यांची अशोक चव्हाण यांनी भेट घेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने वेळ मागितला. त्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.
अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब जावळे व प्रदेशाध्यक्ष पंजाबराव पाटील काळे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथील अशोक चव्हाण यांच्या बंगल्यासमोर ढोल बजावो आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याशिवाय माघार नसल्याचा पावित्रा घेतला होता. यानंतर अनेक आमदार व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण अखेर चव्हाणांनी काही आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
भेटीनंतर छावाचे नानासाहेब जावळे हे पत्रकारांना माहिती देताना म्हणाले, 'आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार सकारात्मक असून सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठविण्यासाठी व याबाबत दुसरा काही पर्याय काढता येईल का? यासाठी आठ ते दिवसाची वेळ चव्हाणांनी मागितली. संघटनेच्यावतीने आम्ही आठ-दहा दिवस नाही तर महात्मा गांधींच्याजयंती पर्यंत वेळ देत पण प्रश्न मार्गी लावण्याची अशी मागणी केली. यानंतर चव्हाणांनी सांगितले की, २ ऑक्टोबर पर्यंत आम्ही गांधीजीच्या संदेशाप्रमाणे राहू. पण त्यानंतर आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यास मात्र आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंह, राजगुरू यांच्या मार्गाने जाण्यास भाग पाडू नका, असा इशाराही राज्य सरकारला दिल्याचे सांगितले. यावेळी छावाचे पंजाबराव काळे, दशरथ कपाटे, परमेश्वर जाधव, विजयकुमार घाडगे, माधवराव ताटे यांच्यासह अनेक छावाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - मराठा आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न करणार - मुख्यमंत्री