मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त वीरमाता जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट( VJTI) मध्ये ३०० हून अधिक विद्यार्थी सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबाना अभिवादन करणार आहेत. विद्यालयाच्या डाॅ. बा. आ. ग्रंथालयमध्ये आज सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत सलग १८ तास अभ्यास करणार आहेत.
128व्या जयंती निमीत्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्रता अभिवादन केले जाते. सलग तिसऱ्या वर्षी VJTI चे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी १८ तास अभ्यास अभियान राबवत आहेत. १८ तासादरम्यान विद्यार्थ्यांना नाश्ता आणि जेवण जागेवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ग्रंथालयातून विविध पुस्तक मिळण्याची व्यवस्था महाविद्यालयाकडून करण्यात आली आहे. १८ तास अभ्यास काळात अभ्यासकांच्या सेवेसाठी प्राध्यापक व इतर स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. सहभागी विद्यार्थिंनींना शेवटच्या लोकलने घरी जाणे शक्य व्हावे, यासाठी सुविधा असणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांना खरे अभिवादन हे अभ्यासातून देणे योग्य ठरेल. बाबासाहेब १८ तास अभ्यास करायचे. याच प्रकारे विद्यार्थ्यांमध्येही बाबासाहेबांकडे असणारे अभ्यासाचे गुण उतरावेत विद्यार्थ्यांनामध्येही एकाग्रता यावी. त्यांना ते किती अभ्यास करू शकतात याची मर्यादा कळावी. युवा पिढी मोबाईलपासून लांब राहवू शकते हे सर्वांना कळावे, यासाठी आम्ही हे अभियान राबवत असल्याची माहिती प्राध्यापक डॉ. वा.भि.निकम यांनी दिली.