नांदेड - भोकर शहरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. शेख यांनी शनिवारी ३ वर्षाची शिक्षा सुनावली.
शहरातील एक अल्पवयीन विद्यार्थीनी शिक्षणासाठी व खासगी शिकवणीसाठी ये-जा करीत असे. आरोपी अमोल अशोक कदम (रा.प्रफुल्लनगर, भोकर) हा मुलीचा पाठलाग करुन तिची नेहमी छेड काढत असे. १७ एप्रिल २०१६ ला पीडित मुलीला रेल्वेस्थानकावर गाठून माझ्यासोबत दुचाकीवर भोकरला चल म्हणत तिच्या जवळील मोबाईल हिसकावून घेतला आणि फोडून टाकला. त्यानंतर तिचा विनयभंग केला.
या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अमोल कदमविरुद्ध भोकर पोलीसांनी कलम ३५४ (ड) भादवी व ११ (४), १२ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम. आय. शेख यांनी करून आरोपीविरुद्ध भोकर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
न्यायालयात ९ पैकी ६ साक्षीदार तपासण्यात आल्यानंतर आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे आरोपी अमोल अशोक कदम यास ३ वर्षाची शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. रमेश राजूरकर यांनी बाजू मांडली.