नांदेड - जिल्ह्यातील मुखेड शहरात एक बारा वर्षांची मुलगी डोळे बंद करून पुस्तक वाचते, असे सांगितले तर त्यावर विश्वास बसेल? मात्र, ही गोष्ट खरी आहे. नंदिनी एकाळे असे या मुलीचे नाव आहे.
मेडिकल व्यवसायात असलेले संतोष एकाळे यांची मुलगी नंदिनी इंदिरा गांधी विद्यालयात सहाव्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. डोळ्यांवर पट्टी बांधून ती नोटांवरील नंबर ओळखणे, वस्तू ओळखणे, रुमालाचा रंग ओळखणे, पुस्तकातील अक्षर ओळखणे, आय. डी. कार्ड ओळखणे अशा विविध प्रकारच्या अकरा बाबी ती सहज ओळखते.
हेही वाचा - नववर्षात शिर्डीत भक्तांची मांदीयाळी; आठ दिवसात साई चरणी 17 कोटींचे दान
डोळे मिटल्यानंतर माझ्या हातातील चित्र माझ्या बुद्धीमध्ये तयार होते. कल्पना शक्तीच्या जोरावर मी डोळ्यांवर पट्टी बांधून सुध्दा पुस्तकातील लिखाण सहज ओळखू शकते. ही जादू नाही, कला आहे, असे नंदिनी सांगते.
नंदिनीच्या वडीलांचे हैदराबाद येथे एक मित्र (लक्ष्मण राठोड) राहतात. त्यांना नंदिनीच्या गुणवत्तेविषयी सांगितल्यानंतर त्यांनी नंदिनीला ही कला शिकवली. ही कला ६ ते १२ वयोगटातील मुलींनाच शिकवता येते. अनेकांना शिकवूनही ती त्यांना अवगत होत नाही. मात्र, नंदिनीने ही कला केवळ तीन आठवड्यांत अवगत केली.
एक वेळेस पाठांतर केल्यास तिला सहज लक्षात राहत आहे. यामुळे तिच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम दिसू लागला आहे, असे तिचे वडील म्हणाले. नंदिनीच्या या गुणामुळे तिचे अनेक शाळांमध्ये कार्यक्रम होतात.