नांदेड - परभणी जिल्ह्यातील पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी धरण पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे विष्णुपुरी धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यातून नदी पात्रात पाण्याचा मोठया प्रमाणात विसर्ग होत आहे. गोदावरी नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
परभणी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्हयातील दिग्रस बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे त्या बंधाऱ्यातून ६८६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे हे सोडलेले पाणी विष्णुपुरी प्रकल्पात येत असल्याने विष्णुपुरी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. दिग्रस बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने बंधाऱ्यांवरील लहान बंधारे भरली आहेत. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क केले जात आहे. दिग्रस बंधाराही शंभर टक्के भरल्याने त्याचे काही दरवाजे उघडण्यात आल्याने ते पाणी गोदावरी नदीद्वारे विष्णुपुरी प्रकल्पात जमा होत आहे. विष्णुपुरी धरण आधीच शंभर टक्के भरल्याने पुन्हा त्यात पाण्याचा येवा वाढत आहे. यासोबतच वरच्या दिशेला असलेल्या जायकवाडी धरणापर्यंत सर्वच बंधारे पूर्ण भरलेले आहे.
हेही वाचा - जालनावासियांची तहान भागवणाऱ्या 'संत गाडगे महाराज तलावा'कडे प्रशासनाचे दुर्लक्ष
विष्णुपुरी धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने आतापर्यंत चारवेळा धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले आहे. अजूनही धरणात पाणी जमा होत असल्याने वेळोवेळी धरणाचे दरवाजे उघडण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातून वाहणारी गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडत आहे . त्यामुळे गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नीळकंठ गव्हाणे यांनी केले आहे .