नांदेड - कोरोना संकटातून बाहेर पडले न पडले की, अनेक रुग्णांना म्यूकरमायकोसिस या आजाराने ग्रासले आहे. नांदेड जिल्ह्यात अशा रुणांची संख्या ९२ झाली आहे. त्यापैकी अतिगंभीर अवस्थेत दाखल झालेल्या १२ रुणांचा मृत्यू झाला आहे. या आजाराला परतवून लावण्याची जोरदार तयारी प्रशासनाने केली आहे. त्यांच्या या प्रयत्नाला यश येत आहे. आतापर्यंत ५० रुग्ण या म्यूकरमायकोसिस आजारातून बरे झाले आहेत.
म्यूकरमायकोसिसचे नवे संकट
म्यूकरमायकोसिसचे काही रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर काही रुग्ण खासगी दवाखान्यात दाखल आहेत. कोरोनाशी गेल्या वर्षभरापासून लढा देणारे प्रशासन; तसेच या आजारातून बाहेर पडलेल्या रुग्णांसमोर म्यूकरमायकोसिस या नावाचे नवे संकट उभे राहिले आहे.
प्रशासन व आरोग्य यंत्रणाही चिंतेत
कोरोनातून बरे झालेल्या अनेक रुग्णांना डोळे, नाक, कान तसेच मेंदूपर्यंत या आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. या आजारामुळे रुग्णांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असे रुग्ण मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. या आजाराचे गंभीर स्वरूप पाहून प्रशासन व आरोग्य यंत्रणाही चिंतेत पडली आहे.
योग्य उपचारपद्धती निश्चित
म्यूकरमायकोसिस या आजाराने नांदेड जिल्ह्यालाही घेरले आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ९२ म्यूकरमायकोसिस रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी अतिगंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेले १२ रुग्ण उपचारादरम्यान दगावल्याचे सांगण्यात आले आहे. हा आजार किती गंभीर आहे, हे लक्षात घेवून प्रशासन व आरोग्य यंत्रणेने मोठ्या पातळीवर तयारी केली आहे. त्यासाठी योग्य ती उपचारपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
नांदेडमध्ये ५० रुग्ण झाले बरे
अनेक रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार मिळाले. त्यामुळे हा आजार त्यांच्या शरीरातून निघून गेला आहे. बरे झालेल्या अशा रुग्णांची संख्या जवळपास ५० आहे. दरम्यान म्यूकरमायकोसिसचे अनेक रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये अन्य जिल्ह्यातील रुग्णांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.
आजारवरील उपचारही महाग
म्यूकरमायकोसिसवरील उपचारासाठी वेळप्रसंगी रुग्णांवर शस्त्रक्रियाही करावी लागत आहे. हे अंत्यत वेदनादायी असते. पण त्याला दुसरा पर्याय किंवा इलाज नाही. दुसरीकडे या आजारावरील उपचारही खूप महाग असून लाखो रुपये खर्च होतो. ही रक्कम उभी करताना रुग्णांच्या नातलगांना अक्षरशः घाम फुटत आहे.
हेही वाचा - महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून म्यूकरमायकोसिसवर मोफत उपचार
म्यूकरमायकोसिस अंगावर काढू नये - जिल्हाधिकारी
'नांदेड जिल्ह्यात सद्यस्थितीत म्यूकरमायकोसिसचे रुग्ण घटले आहेत. शासकीय रुग्णालयात अशा रुग्णांवर आपण मोफत उपचार करत आहोत. तसेच गरज पडल्यास शस्त्रक्रियाही करण्यात येत आहे. आतापर्यंत 10 ते 15 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यात गंभीर झालेल्या 10 ते 12 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. काही रुग्ण जसे कोरोना अंगावर काढत होते. तशीच काहीशी परिस्थिती म्यूकरमायकोसिसच्या बाबतीतही दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णांनी अंगावर दुखणे न काढता वेळीच उपचार घ्यावा', असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इंटनकर यांनी केले आहे.
हेही वाचा - मुंबईत 70 वर्षीय जैन मुनीची आत्महत्या