नांदेड - पंजाब आणि हरियाणा राज्यातील भाविकांची घरवापसी सुरू झाली आहे. नांदेडच्या गुरुद्वारात साडेतीन हजार भाविक अडकले होते. गुरुवारी २३ एप्रिलला रात्री अकरा वाजताच्या सुमारास बसेसमधून 330 भाविक पंजाबकडे रवाना झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी मिळाल्याने भाविकांची घरवापसी होत असल्याचा गुरुद्वारा बोर्ड सदस्यांचा दावा आहे.
पंजाबमधील यात्रेकरूंना केंद्र व राज्य सरकारने परवानगी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलेल्या माहितीवरून, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्र शासनाला यात्रेकरूंना पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांनी नांदेडमध्ये अडकलेल्या लोकांना पंजाबला पाठवण्याचा निर्णय घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. प्रत्येकाला एकाच वेळी पाठवता येत नाही. त्यामुळे हे प्रवासी टप्प्याटप्प्याने गुरुवारपासून पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे खासदार चिखलीकर यांनी सांगितले होते.
सेवा सुरूच राहणार - रविंद्रसिंग बुंगई
पंजाब व हरियाणा राज्यातील भाविक महिनाभरापासून होळीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नांदेडमध्ये आले होते. केंद्र-राज्य शासनातील महत्वाच्या मंत्री यांनी सहकार्य केल्यामुळे गुरुवारी पहिल्या वातानुकूलित ३० बसेस पंजाबसाठी रवाना झाल्या आहेत. सर्व यात्रेकरू घरी पोहोचेपर्यंत ही सेवा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यासाठी परवानगी मिळाली असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचेही आभार मानत असल्याची प्रतिक्रिया गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रवींद्र सिंघ बुंगई यांनी दिली आहे.