नांदेड - लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा येथे मतदान बंदोबस्तासाठी पाठविण्यात आलेले काही पोलीस कर्मचारी गैरहजर आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. अशा एकूण १२ पोलीस कर्मचाऱयांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १२ पोलीस कर्मचाऱयांवर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
यापूर्वी अनेक निवडणुका पार पडल्या. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा होत आहे. प्राप्त माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान बंदोबस्तासाठी नांदेड जिल्ह्यातील काही पोलीस कर्मचारी सोलापूर तर काही कर्मचारी सातारा येथे पाठविण्यातआले होते. जिल्ह्यातील वेगवेगळे पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांसह अन्य शाखेतील जवळपास ४०० कर्मचारी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २५० पोलीस कर्मचारी सातारा येथे मतदान बंदोबस्तासाठी रवाना केले होते. परंतु , २५० पैकी १२ पोलीस कर्मचारी गैरहजर असल्याचे समोर आल्यानंतर त्यासंबंधीचेपत्र सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून नांदेड पोलिसांना प्राप्त झाले. निवडणुकीच्या काळात कर्मचारी गैरहजर राहिल्याची बाब नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी गंभीर्याने घेत निवडणुकीच्या महत्त्वाच्या कामात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्या १२ कर्मचाऱयांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हा विशेष शाखेच्या पोलीस उपनिरिक्षकास दिल्या आहेत. याप्रकरणी लोकप्रतिनिधी अधिनियमा नुसार १२ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.