नागपूर : सध्या विदर्भाच्या अनेक भागात गहू, हरभरा (चना) आणि कापूस पीक काढणीला आले आहे. अवकाळी पावसामुळे हे पीक धोक्यात येणार आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा पूर्व विदर्भाला बसण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकरी आता लगबगीने कामाला लागले आहेत. १५ ते १७ अवकाळी पावसाचे सावट असल्याची माहिती, नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली आहे. तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे.
अलर्ट मॅसेज : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने मॅसेज पाठवायला सुरुवात केली आहे. पुर्व विदर्भात काही भागात विजेच्या जोरदार कडकडाटसह सोसाट्याच्या वारा आणि गारपीट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कृपया याची नोंद घेण्यात यावी असे, आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
उन्हाचा पारा घसरणार : मध्यंतरी नागपूरसह विदर्भाला उन्हाचा तडाखा सहन करावा लागला होता, काही शहरात तर तापमानाचा पारा 38 डिग्री पर्यत गेला होता. मात्र, अवकाळी पाऊसामुळे पुन्हा वातावरणात बदल होऊन उन्हाचा पारा घसरणार आहे.
हवेची दिशा बदलली : साधारणपणे उन्हाळ्यात उत्तरेकडून उष्ण वारे दक्षिणेकडे वाहतात. मात्र दक्षिणेकडील हवेचा जोर वाढल्याने उत्तरेकडील उष्ण वाऱ्यांचा जोर कमजोर पडला आहे. दक्षिणेकडील हवेत आद्रता असल्याने विदर्भात अप्पर ट्रफ वे म्हणजे (द्रोनिका) तयार झाल्याने, सलग चार ते पाच दिवस विदर्भाच्या आकाशात ढगांची गर्दी जमेल आणि अवकाळी पावसाचा धोका निर्माण होणार असल्याची माहिती, नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांच्याकडून प्राप्त झालेली आहे.
आधीचे पंचनामे पूर्ण होण्यापूर्वीचं नवीन संकट : गेल्या आठवड्यात विदर्भातील काही भागाला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकसानग्रस्त शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश दिले असून; अद्याप पंचनामे पूर्ण झाले नसताना पुन्हा अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे.
(प्रेस नोट)