नागपूर - जनतेने युतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. आज (गुरूवारी) येथील विमानतळावर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गडकरी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची निवड सर्वानुमते झाली असल्याने त्यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हायला हवे. शिवेसेनेसोबत सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू आहे आणि लवकरच त्याबाबत निर्णय होईल. आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडकरी आज (गुरूवारी) संध्याकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आपण दिल्लीतच आनंदी आहोत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार नसल्याचेही यावेळी सांगितले.
हेही वाचा - भाजपला सत्तेपासून दूर ठेवा; काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत आमदारांची मागणी
राज्यातील सत्ता संघर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेने मध्यस्थी करण्याकरिता गडकरीच्या नावाला पसंती दिल्यानंतर या विषयावर तोडगा काढण्यासाठी नितीन गडकरी सक्रिय झाल्याचे बघायला मिळत आहे. सत्तासंघर्षाचा तिडा सोडवताना महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप-सेनेच्या महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाला. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून सेना-भाजप दोनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरल्याप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी शिवेसेनेने केली आहे.
हेही वाचा - होऊ दे चर्चा..! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' न लागलेल्या फलकाची जोरदार चर्चा