नागपूर : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नागपूरात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी सत्ताधारी भाजप सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.
'2014 मध्ये आम्ही युती तोडली नाही' : उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्तेच्या लोभाने अनेकांचे बळी घेतले आहेत. सभेत बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची क्लिप लावली. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे कलंक असल्याचे ते यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, 'भाजप आज म्हणत आहे 2014 मध्ये युती आम्ही तोडली होती, मात्र मला एकनाथ खडसे यांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितले की आमच्या लोकांची शिवसेनेसोबत राहण्याची इच्छा नाही. तेव्हा आम्ही कॉंग्रेस सोबत नव्हतो, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला'.
'तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली' : उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये शिवसेनेबरोबर युती तुम्ही तोडली. तुम्ही विश्वासघात केला. तुम्ही भगव्या झेंड्यामध्ये देखील फाटा-फूट केली. ही हिंदुत्वाशी गद्दारी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. धनुष्य बाणाबाबत (शिवसेनेचे पक्षचिन्ह) तुम्ही संभ्रम निर्माण केला, ही प्रभू राम चंद्राशी गद्दारी आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
'मोदींना सुद्धा बजरंग बलीला आवाहन करावं लागलं' : 'कर्नाटकातील भाजप सरकार एवढं बदनाम झालं होतं की, शेवटी मोदींना सुद्धा बजरंग बलीला आवाहन करावं लागलं', असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ते म्हणाले की, शिवसेना फोडल्यानंतर सरकार मजबूत होतं, तरी त्यांनी गद्दारी करून राष्ट्रवादीला फोडलं. आधी राष्ट्रवादीवर हजारो कोटींचा घोटाळे करणारा पक्ष म्हणून टीका केली, आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसल्याचे ते म्हणाले.
'राम मंदिराचा फैसला तुम्ही केलेला नाही' : उद्धव ठाकरे भाजपवर टीका करताना म्हणाले की, 'राम मंदिराचा फैसला तुम्ही केलेला नाही. हा कोर्टाने दिलेला निर्णय आहे. बाबरी पाडल्यानंतर तुमचेच नेते मोठी चूक झाली असे म्हणाले होते. त्यामुळे आमच्या हिंदुत्वावर शंका उपस्थित करायची नाही', असा इशारा त्यांनी दिला. भाजप दंग्यावरती राजकारणाच्या पोळ्या भाजतो, अशी घणाघात त्यांनी केला.
राज्यात भ्रष्टाचार सदाचार झाला : उद्धव ठाकरे भाषण करण्याकरता उभे होते त्यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी '50 खोके एकदम ओके' अशा घोषणा सुरु केल्या. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या नवीन राजकीय घडामोडी घडल्या आहेत, त्यानंतर आता 50 खोक्यांची किंमत कमी झाली आहे. तरी देखील हा मुद्दा तेवत ठेवायचा आहे. राज्यात भ्रष्टाचार हा सदाचार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला.
हे ही वाचा :